उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये करोनाचा विळखा वाढत असून उमरगा येथील महिलेसह एकुण 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथेही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 24 वर पोहचली आहे. जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल सुरू आहे.
आतापर्यंत चौघांवर यशस्वी उपचार करुन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 20 जणांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. त्यातील एक जणावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाकडून शिथिलता आणण्यात येत असताना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर करोनामुक्त झालेला जिल्हा महिनाभराच्या अवधीनंतर पुन्हा करोनाबाधितांच्या यादीत आला आहे.
एक-एक करत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आता करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा विळखा संबंध जिल्हाभरात घट्ट होत चालला असल्याने अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.