ऑस्कर २०१९ : भारताच्या ‘या’ चित्रपटानेही मारली बाजी 

चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये रंगला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या एका सिनेमानीही पुस्कारावर नाव कोरले आहे. ‘पिरीएड एंड ऑफ सेन्टेंस’ या चित्रपटाला डॉक्‍युमेंटरी शॉर्ट सब्जेक्‍ट या श्रेणीमध्ये ऑस्कर मिळाला आहे.

26 मिनिटांच्या या सिनेमामध्ये उत्तर भारतातील दिल्लीजवळच्या हापूरजवळ काथीखेडा गावातील काही महिला आणि त्यांच्या अनुभवांची मांडणी यात करण्यात आली आहे. पॅडमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या अरुणाचलम मरुगंथम यांनी बनवलेल्या स्वस्तातील सॅनिटरी नॅपकीन बनवण्याच्या मशीनमधून सॅनिटरी नॅपकीन बनवण्याचा अनुभव या सिनेमात दर्शवला आहे.

पोलीस इन्स्पेक्‍टर बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी पण प्रत्यक्षात गावाच्या बाहेरही पाऊल न ठेवणारी एक मुलगी या कारखान्यात काम करण्याचा अनुभवाला कथन करते. संपूर्ण गावात मासिक पाळीबाबतचे वैज्ञानिक अज्ञान असते. स्वाभाविकच त्याच्याशी संबंधित काही अंधश्रद्धाही असतात. मुरुगंथम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून या गावात हा सॅनिटरी नॅपकीनचा कारखाना सुरू होतो. हळूहळू या नॅपकीनबाबतचे सगळे गैरसमज दूर होतात आणि गावातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. नंतर जे पुरुष पॅडला विरोध करत होते, ते देखील या कामामध्ये हातभार लावायला पुढे येतात, अशी सर्वसाधारण संकल्पना असलेल्या “पिरीएड एंड ऑफ सेन्टेंस’बाबत उत्सुकता वाटावी. कारण त्यात कोणीही नावाजलेला कलाकार नाही. आहेत ते केवळ सर्वसाधारण गावकरी आणि महिला. या माहितीपट, चित्रपटातून एकाचवेळी महिलांचे आरोग्य, स्वतःची काळजी न घेण्याची मानसिकता, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि युवकांमध्ये जाणीव निर्माण केल्यानंतर होणारे परिवर्तन असे अनेक आयाम असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.