“आरटीई’अंतर्गत सहज प्रवेश : अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरणार
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अनाथ बालकांच्या शाळा प्रवेशासाठी कागदपत्रे जमा करण्याच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे या मुलांना दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या 16 जानेवारी 2018च्या निर्णयानुसार राज्यात “आरटीई’ अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे. या अंतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अनाथ बालकांना प्रवेश देताना अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, तरीही या बालकांच्या प्रवेशांकरिता इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. याची दखल घेऊन स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
“आरटीई’ प्रवेशाकरीता अनाथालयामधील विद्यार्थी या संवर्गाचा समावेश करण्यात यावा. याबाबतची सुविधा आरटीई पोर्टलमध्ये एनआयसीने उपलब्ध करुन द्यावी. अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरावीत. उत्पन्नाच्या दाखल्याची अट घालू नये, अशा सूचना सह सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी दिल्या आहेत.
असा भरता येणार अर्ज
सरल डेटाबेसमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी एनआयसीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या विद्यार्थ्यांना आई-वडिल यांचे नाव माहित नसल्याने त्या ठिकाणी “नॉट नोन’ असे नमूद करावे लागणार आहे. आडनाव, धर्म माहिती नसल्याने त्या ठिकाणीही “नॉट नोन’ असा स्पष्ट उल्लेख नमूद करावा लागणार आहे. कॅटेगरी या पर्यायात अनाथ असे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अनाथ मुलांच्या शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना दत्तक घेतल्यास दत्तक घेणाऱ्या पालकांचे नाव व आडनाव अद्ययावत करण्यासंदर्भात “न्यू एन्ट्री’ टॅब उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.