सरस्वती आश्रम : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळतोय वाव
पिंपळे गुरव – करोनामुळे यावर्षी कुठेच मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही. एकदम साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन झाले. दापोडीतील सरस्वती आश्रमातील अनाथ मुलांनी देखील वेगवेगळ्या कलाकृती साकारून गणरायासाठी आरास तयार केली.
करोनाच्या काळात सर्व शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी आपआपल्या घरी गेले. परंतु ज्यांना आश्रमशिवाय कोणीच नाही त्यांनी आश्रमातील आपले सहकारी मित्रांबरोबर करोनाचा काळ व्येतीत केला. परंतु या काळात ऑनलाइन शिक्षणाबरोबरच आपल्या ठिकाणी असलेल्या कलागुणांना देखील वाव दिला. शाळा बंद असल्याने आश्रमातील विद्यार्थ्यांनी अभ्यासबरोबर आपल्याला येत असलेल्या विविध कला पेंटिंग, हस्तकला, देखावे, भित्तिपत्रके यांनी आपल्या आश्रमातील वर्गखोल्या सजविल्या. तसेच या कलाकृतींचा वापर त्यांनी गणरायाची आरास करण्यासाठी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.
आश्रमात तीस विद्यार्थी आहेत. ते एकमेकांची काळजी घेत आहेत. करोनाच्या काळात प्रत्येकाला वेळ कसा घालवावा असा प्रश्न होता. परंतु या विद्यार्थ्यांनी मात्र वेळेचा सदोपयोग करून घेतला. शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून आपल्या कलागुणांना वाव दिला.
आश्रमातील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा, बाटली पेंटिंग. करोना योद्ध्यांसाठी संदेश बनविले, कागदी घड्याळ. सूर्य माला. पेपर बॅग, डिझाइनिंग, चित्रकला, वर्ग सजावट, कागदी कपडे, मखर आदी वस्तू बनविल्या. जे आपल्याला येत नाही ते सहकारी मित्रांकडून शिकून घेतले. त्यामुळे करोनामुळे मिळालेल्या वेळेचा एक प्रकारे सदोपयोग करून घेतला. या वेळी या आश्रम शाळेचे संस्थापक दीपक सुरवसे, उपाध्यक्ष पौर्णिमा कांबळे, अधीक्षक विश्वनाथ साठे यांनी या विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.