करोनाला “जागतिक संक्रमण’ (पॅन्डेमिक) घोषित करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्यापाठोपाठ भारताने एक महिन्यासाठी जगापासून विलग होण्याचा निर्णय जाहीर केला.
जागतिकीकरणाच्या काळात जगापासून देश तोडण्याचा निर्णय हा करोनाचं गांभीर्य अधोरेखित करणारा आहे. सरकारी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, संयुक्त राष्ट्रांशी निगडित अधिकारी वगळता भारतात येऊ पाहणाऱ्या सर्वांचे व्हिसा महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
तसं पाहायला गेलं तर जगापासून तुटण्याच्या निर्णयामुळे कुणी “अस्वस्थ’ होण्याचं कारण नाही आणि खरं तर तशी शक्यताही नाही. कारण आजची पिढी “स्मार्ट’ असल्यामुळे कुणापासून तुटण्याचे वैषम्य या पिढीला तसं कमीच! अर्थात “आजची पिढी’ असा सरसकट शब्द वापरण्याचेही दिवस आता राहिलेले नाहीत.
“आजची’ म्हणजे नेमकं कोण अपेक्षित आहे, हे स्पष्ट करावं लागतं. “जनरेशन एक्स’ शब्द ठाऊक होता; पण “वाय’ आणि “झेड’ जनरेशनसुद्धा असते हे फार उशिरा कळलं. शिवाय मिलेनियल, सेन्टेनियल हे शब्दही ठाऊक नसणं म्हणजे घोर अज्ञान होय, हेही समजलं. 1945 पूर्वी जन्मलेले “सायलेन्ट जनरेशन’वाले होत, 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेले “बेबी बूमर्स’ होत, 1965 ते 1979 दरम्यान जन्मलेल्यांची पिढी “जनरेशन एक्स’ तर 1980 ते 1995 दरम्यान जन्मलेले “जनरेशन वाय’ अर्थात “मिलेनियल्स’ होत. 1996 नंतर जन्माला आलेले सगळे “सेन्टेनियल्स’ अर्थात “जनरेशन झेड’चे प्रतिनिधी होत.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाची माहिती वाचताना जनरेशनच्या गणिताची उजळणी झाली आणि वय कोणतंही असो, स्मार्टफोन हा साऱ्यांचा “लसावि’ आहे हेही लक्षात आलं. वस्तुतः स्मार्टफोन हा आता अधिकृतपणे “मानवी अवयव’ घोषित करण्यास हरकत नसावी.
किंबहुना ती वेळ आलीच आहे आणि म्हणूनच कशापासून आणि कुणापासून तुटण्याचं शल्य कुणाला असणार नाही, हे छातीठोकपणे सांगता येतं. स्मार्टफोनपासून तुटण्याची वेळ आली, तर मात्र अवघड आहे. कारण स्मार्टफोन घरी विसरला तर बहुतेकांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी होते, असं हे सर्वेक्षण सांगतं.
विशेष म्हणजे, या अस्वस्थतेचं प्रमाण पुरुषांमध्ये 64 टक्के तर महिलांमध्ये 73 टक्के दिसून येतं. आम्ही स्मार्टफोनशिवाय जगू शकत नाही, असं रोखठोकपणे सांगणाऱ्यांचं प्रमाणही पुरुषांमध्ये 60 तर महिलांमध्ये 70 टक्के आहे. “इंडिया डिजिटल वेलनेस रिपोर्ट’ नावानं प्रसिद्ध झालेल्या या अहवालात मुख्यत्वे खासगीपणाच्या सुरक्षिततेवर भर दिला गेला आणि या दक्षतेबाबतसुद्धा पिढ्यांमध्ये चढत्या क्रमानं म्हणजे एक्स, वाय आणि नंतर झेड अशा क्रमानं अधिकाधिक जागरूकता दिसून आलीय.
स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटी ऍप्लिकेशन कुणाकडून किती वापरली जातात, यावरून ही बाब लक्षात येते. थोडक्यात, खासगीपणा बहुतेकांकडून जपला जातोय.
डेटिंग ऍप्स कुठली पिढी कशासाठी अधिक वापरते, याचे डिटेल्स या अहवालात आहेतच; पण खासगीपणा जपण्यानं माणसाच्या मनातलं “तुटण्याचं’ भय पळून गेलंय, हेही स्पष्टपणे दिसून येतंय.
याला आत्मकेंद्रीपणा म्हणा किंवा आत्ममग्नता म्हणा, यामुळे होणाऱ्या नुकसानीची कितीही आकडेवारी मांडा, रेडिएशनच्या दुष्परिणामांवर कितीही लेख लिहा… हा “अवयव’ आता मानवी शरीरापासून विभक्त होणे नाही. वेगळ्याच प्रकारची “समता’ स्मार्टफोननं प्रस्थापित केलीये. जनरेशन एक्स, वाय, झेडचा भेदाभेद हीसुद्धा निव्वळ अंधश्रद्धा!
अबाऊट टर्न
हिमांशू