लोणावळ्यात महापौर परिषदेचे आयोजन : 16 महापौरांची उपस्थिती
पिंपरी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराचे महापौर पद भूषविले असल्याने महापौरांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व 27 महापौरांना विशेष प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर परिषदेच्या उद्घाटन समारंभावेळी केली.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट् महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व्या महापौर परिषदेचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते. या परिषदेला राज्यातील विविध 16 महापालिकांचे महापौर उपस्थित होते.
जर शहरात जर एखादी समस्या उद्भवल्यास सामान्य नागरिक हे महापौरांना जबाबदार धरतात. नागरिकांच्या रोषाचा सामना महापौरांना करावा लागतो. तर अनेक नागरिकांची महापौरांकडून त्यांच्या रास्त मागण्यांसंबंधी न्याय मिळण्याची त्यांची भावना असते. मात्र महापौर हे संबंधित अधिकारी वर्गास सूचना देण्याशिवाय काहीही करु शकत नाहीत. अशी भावना सर्व महापौरांनी व्यक्त केली.
महापौर राहुल जाधव व इतर उपस्थित सर्व महापौरांनी परिषदेत यापूर्वी महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी जे विविध ठराव करुन शासनाला पाठविले त्याबाबत ठोस निर्णय न झाल्याची खंत व्यक्त केली.
आगामी महापौर परिषद पिंपरीत
यापुढील महापौर परिषद ही जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले जाईल, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी यावेळी दिली.