कोपरगाव, (प्रतिनिधी)– कोपरगाव शहर आणि परिसरातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ३१ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विवेकभैय्या कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
भक्तनिवास क्रमांक दोन, संत जनार्दन स्वामी आश्रम, पुणतांबा फाटा, कोपरगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. ११,१४, १९ वर्षांखालील गट आणि खुला गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
३१ ऑगस्ट रोजी दुपारी ११.०० वाजता युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी चारही गटांत एकूण ६५ रोख बक्षिसे आणि १३० चषक स्वरुपात ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी महिला व मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसे व चषक ठेवण्यात आले आहेत.
ही सर्व बक्षिसे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.ही स्पर्धा स्विसलिग पद्धतीने होणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी येताना आपल्या सोबत चेस बोर्ड आणावेत, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.स्पर्धेचे मुख्य पंच (ऑर्बीटर) म्हणून गुरुजीत सिंग व सागर गांधी हे काम करणार आहे.