बारामती – जीएसटी संदर्भातील सविस्तर माहिती व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योजकांना व्हावी या दृष्टिकोनातून बारामतीत जीएसटी कायदा आणि प्रक्रियेमधील अलीकडील बदल या विषयावर करदाता संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती, दौंड, इंदापूर आणि जेजुरी येथील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक, जीएसटी प्रॅक्टिशनर्स आणि व्यापारी संस्थांसाठी या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन केले गेले.
सेंट्रल जीएसटी आणि पुणे कस्टम झोनचे मुख्य आयुक्त एस,एम, टाटा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासमवेत प्रभारी आयुक्त राजीव कपूर, अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे हेही उपस्थित होते. याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, टॅक्स प्रॅक्टिस कन्सलटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट, बारामती व्यापारी महासंघ, बारामती बिल्डर असोसिएशन, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनेस आणि चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या शंभरहून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.
करदाता संपर्क कार्यक्रम नेमका काय आहे, हे समजून सांगण्याकरिता मराठी भाषेत या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. फ्री पॅकेजेड अँड लेबल कमोडिटीज या विषयावर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळेस करण्यात आले.
दरम्यान 47 व्या जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीनुसार अंमलात आलेल्या जीएसटी कायदा आणि पालन या संदर्भात या कार्यक्रमादरम्यान एका प्रेझेंटेशनचे सादरीकरण करण्यात आले. व्यापारी संघटनांच्या जीएसटी आणि त्याच्या अनुपालना संबंधी शंकांचे निरसन यावेळी अधिकाऱ्यांनी केले. जीएसटी च्या संदर्भात बारामतीतील व्यापारी व उद्योजकांच्या सूचनाबाबतचे एक निवेदन यावेळेस जीएसटी अधिकाऱ्यांना देण्यात आले. सदरील जीएसटी बाबतच्या व्यापाऱ्यांच्या भावना वरिष्ठां पर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.