संगमनेर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशन व बृहमहाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पाचव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेत खेलो इंडिया व नॅशनल गेम्स् स्पर्धेत विजेत्या खेळाडूंसह राज्यातील एक हजारांहून अधिक योगासन खेळाडू सहभागी होणार आहेत.
योगासनांच्या वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी तीन गट करण्यात आले असून, संगमनेरकरांना योगासनांचे थरारक प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार आहे.
मागील चार वर्षांपासून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळवणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये सलग पाचव्यांदा ही स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी सब ज्युनिअर (वय 10 ते 14 वर्ष), ज्युनिअर (वय 14 ते 18 वर्ष) आणि सिनिअर (वय 18 ते 28 वर्ष) असे तीन स्वतंत्र गट करण्यात आले असून पारंपरिक योगासन, कलात्मक योगासन (एकेरी व दुहेरी) आणि तालात्मक योगासन दुहेरी अशा चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
शुक्रवारी (दि.16) सकाळी 8 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल.
तीन दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत होत असलेल्या या स्पर्धेत खेलो इंडिया व नॅशनल गेम्स्मध्ये सदैव विजेतेपद मिळवणार्या खेळाडूंसह राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एक हजारांहून अधिक प्रतिभावान योगासन खेळाडू सहभागी होत आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून संगमनेरकरांना योगासनांची थरारक प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार असून, अधिकाधिक योगासनप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, कोषाध्यक्ष कुलदीप कागडे यांच्यासह योग परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.