के.के.मार्केट जवळील ओढ्यावर अस्ताव्यस्त; मनपाचे दुर्लक्ष
कात्रज (प्रतिनिधी) – के.के मार्केट जवळ असलेल्या ओढ्यावरील पुलावर जवळ कचरा कुंडी नसल्याकारणाने सर्व कचरा रस्त्यावर येत आहे. या कचऱ्यामध्ये मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् तसेच अन्य जैविक कचरा फेकला जात आहे.
करोना महामारीच्या काळामध्ये जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याची जबाबदारी संबंधीत रुग्णालयांची आहे, तसे आदेशही मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवीत बोलण्यास नकार दिला.
येथील जैविक कचरा डुकर, कुत्री अस्ताव्यस्त करीत असल्याने तो रस्त्यावर येत आहे. याच कचऱ्यावरून वाहने तसेच नागरिक चालत जात असल्याने त्याद्वारे करोना विषाणू थेट घरापर्यंत जाऊ शकतो. यामुळे येथे कचरा कुंडी ठेवण्यात यावी तसेच कचरा उचलण्यात येवून जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. करोनाचे संकट असतानाच डुकरांमुळे अन्य आजार पसरण्याचीही भीती आहे. या बाबतची तक्रार संबंधित ठेकेदार तसेच पालिकेकडे करूनही काहीही कारवाई झालेली नाही.