पुणे – “अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया मोठी असून, त्याला वेळेची मर्यादा आहे. त्यात अनेक लोकांचे योगदान असून, प्रत्यारोपण म्हणजे पुनर्जन्मच. तुमच्या टीमने अनेक लोकांना खऱ्या अर्थाने संजीवनी दिली आहे,’ असे मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.
अवयवदानाचे महान कार्य करणारे दाते आणि त्यांचे कुटुंबीय तसेच गंभीर रोगांशी जिद्दीने झुंज देत नव्याने आपले आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या लढाऊ वृत्तीचा सन्मान सोहळा सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने आयोजीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खेडेकर यांच्या हस्ते “नवसंजीवनी’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्रारअली दलाल, अवयव प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलियरी सर्जरी विभागाचे संचालक व प्रमुख डॉ. बिपिन विभूते, वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगलीकर, डेक्कन युनिटच्या वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. विकास कर्णे उपस्थित होते.
डॉ. विभूते म्हणाले, “एकीकडे प्रत्यारोपणाच्या यशाचे प्रमाण वाढत असताना लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे. परंतू, आपण अजूनही अशा स्थितीत आहोत जिथे देशात रोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक रुग्णांना अवयव उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागतो. ही दरी कमी झाली पाहिजे, म्हणूनच अवयवदानाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे.’
यावेळी अब्रारअली दलाल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. बिपिन विभूते यांच्या नेतृत्वात यकृत प्रत्यारोपण टीममध्ये प्रत्यारोपणडॉ. शीतल महाजनी, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अपूर्व देशपांडे, डॉ. विकास चौधरी, डॉ.अभिजीत माने, डॉ. स्नेहवर्धन पांडे, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, डॉ. किरण ताठे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सौ. शर्मिला पाध्ये, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे आणि अमन बेले हे कार्यरत आहेत.