राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश काढावा : उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या 18 खासदारांसह घेतले रामलल्लाचे दर्शन

लखनौ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास व्यक्त केला. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने अध्यादेश काढावा, असेही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी गेल्या वर्षी अयोध्येत आलो होतो. तेव्हा पुढील वर्षी पुन्हा येईन, असे आश्वासन दिले होते. आज मी माझे आश्वासन पूर्ण केले आहे. एनडीए सरकार लवकरच अयोध्येत राम मंदिर बांधेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्यापासून संसदेचे कामकाज सुरू होत असून रामलल्लाचे दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत आहेत. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. तसेच आम्ही एनडीएतील सर्व पक्ष त्यांच्यासोबत आहोतच. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अध्यादेश आणून आपण राम मंदिर बांधू, असे ते म्हणाले. राम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज सकाळी 9च्या सुमारास उद्धव ठाकरे अयोध्येतील फैजाबाद विमानतळावर उतरले. उद्धव यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे 18 खासदार कालच (शनिवारी) अयोध्येमध्ये दाखल झाले होते. 10 वाजता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचे दर्शन घेतले.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी “पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला होता. भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. परंतु मंदिराच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×