“त्या’ आडत्यांना दंडाचे 30 कोटी 15 दिवसांत भरण्याचे आदेश

बाजार समितीची नोटीस : शेतकऱ्यांच्या पट्टीतून 12 कोटी रुपये अधिक कापले
प्रशासक देशमुख यांची कारवाई
पुणे(प्रतिनिधी) -डाळींब शेतकऱ्यांच्या पट्टीतून अतिरिक्‍त हमाली, भराई, तोलाई, खरेदीदारांकडून नियमांपेक्षा अधिक लेव्ही आणि इतर बाजार शुल्काच्या नावावर ज्यादा पैसे कापल्याप्रकरणात मार्केटयार्ड येथील डाळींब यार्डातील “त्या’ चार आडत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोठावलेला 30 कोटी 55 लाख रुपयांचा दंड 15 दिवसांत भरण्याचा आदेश प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिला आहे. याबाबत चौघांना नोटीस बजावली आहे.

के. डी. चौधरी, मे. सिद्धारूढ फ्रुट एजन्सी, मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे, मे. भास्कर नागनाथ लवटे या चार आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी बाजार समिती प्रशासनाने ताब्यात घेतले होते. 1 एप्रिल 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत पट्ट्या सनदी लेखापालांकडून तपासण्यात आल्या. त्यात या चार आडत्यांनी हमाली, भराई, तोलाई नियमापेक्षा अधिक कापत 2 वर्षांत 12 कोटी 22 लाख 13 हजारांची लूट केल्याचे उघड झाले होते. त्यात बाजार समितीच्या शुल्काचाही समावेश आहे.

या फसवणुकीबाबत बाजार समितीने संबंधित आडत्यांना लुटीच्या रक्‍कमेसह दीड पट दंडाची रक्‍कम म्हणजेच 30 कोटी 55 लाख 33 हजार रुपये भरण्याची नोटीस नोव्हेंबरमध्ये बजावली होती. यावर 15 दिवसांत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. यानंतर संबंधित आडत्यांनी मांडलेले खुलासे असमाधानकारक आल्याने ही रक्‍कम वसूलपात्र असल्याचे सांगत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी 15 दिवसांत पैसे भरण्याच आदेश दिले आहेत.

हे आहेत लूट करणारे आडते
आडतदार                                रक्‍कम
मे. के. डी. चौधरी                 13 कोटी 21 लाख 86 हजार 575.
मे. भास्कर लवटे                   3 कोटी 96 लाख 50 हजार 330.
मे. सिद्धरुढ एजन्सी               8 कोटी 60 लाख 80 हजार 205.
मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे     4 कोटी 76 लाख 19 लाख 725.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.