पुणे – ब्रिटनहून पुण्यात आलेल्या तरुणाला करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्यावर त्याच्याबरोबरच विमानाने आलेल्या प्रवाशांचा माग घेण्याला महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. संबंधित तरुणाच्या विमानातून मुंबई किंवा पुण्यात दाखल झालेल्या प्रवाशांची माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण आरोग्य सेवा विभागाकडे मागवली आहे.
महापालिकेतर्फे 1 डिसेंबरपासून ब्रिटनहून विमानाने शहरात आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये 13 डिसेंबर रोजी ब्रिटनहून राज्यात परतलेल्या प्रवाशांपैकी पुण्यातील 26 वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्याला डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले.
त्याचबरोबर त्याला करोनाच्या नव्या विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याचे नमुने 26 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले. त्यावर संबंधित तरुणाला ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, चौदा आणि पंधराव्या दिवशी रुग्णाची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला डिस्चार्ज दिला असून, घरीच विलगीकरणात ठेवले आहे.
मात्र, खबरदारी म्हणून संबंधित तरुणासोबत विमानाने आलेल्या प्रवाशांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित तरुणाच्या विमानातून आलेल्या प्रवाशांपैकी ज्या प्रवाशांचे पत्ते महापालिकेच्या हद्दीतील आहेत, त्यांची माहिती मागवली आहे.