खोदकामात आढळली पेशवेकालीन जलरचना

पुणे – शनिवारवाड्याच्या शेजारील रस्त्यावर काम सुरू असल्याने रस्ता खोदला आहे. या कामादरम्यान काही फुटांखाली पाण्याचा साठा आढळला आहे. ही पेशवेकालीन जलरचना असल्याचे मत तज्ज्ञांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शनिवारवाड्यात पेशव्यांचे वास्तव्य होते. त्यादरम्यान पेशव्यांनी कात्रज येथे तलावांची रचना करून जलरचना केली होती. या रचनेद्वारे कात्रजहून शहरातील पेठांसह विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात येत होता. पालिकेकडून अप्पा बळवंत चौकाकडून पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामकाज करण्यात येत आहे.

शनिवारवाड्याच्या पश्‍चिम-उत्तर दिशेच्या बाजूला काम करताना कामगारांना या ठिकाणी वाहते पाणी आढळले असून, ही तत्कालीन जल रचना असल्याचे सांगण्यात येत आहे.
1749 साली नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून पुण्याकडे पाणी आणले होते. 1920 पर्यंत हे पाणी वापरात होते. ते दगडी आणि खापरी नळाद्वारे हे पाणी वितरित होत होते. हे त्या जल वितरणाचे भाग असल्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले.

नानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे दोन तलाव बांधले होते. भुयाराप्रमाणे बंदिस्त बांधकाम करून शहरात खापऱ्याच्या पाइपद्वारे हे पाणी शनिवारवाडा, वेगवेगळ्या हौदांमध्ये नागरिकांसाठी आणि सरदारांच्या घरांसाठी हे पाणी पोहोचवण्यात येत होते. शनिवारवाड्यात गणेश दरवाजाजवळ या पाण्याचा खजिना होता. त्यातून हे पाणी शनिवारवाड्याला मिळायचे. 250 ते 245 वर्षांपूर्वी ही भारतातील बंदिस्त आणि आधुनिक नळ व्यवस्था होती. आजही हे पाणी कात्रजहून येत आहे.

मागील काही वर्षांपर्यंत पेठांतील सार्वजनिक हौदांतील पाणी नागरिक वापरत होते. विविध कामांमुळे भुयारांचे छत ढासळले होते. याठिकाणी पुन्हा स्लॅब बांधण्यात येत आहे. शनिवारवाड्याजवळ यापूर्वीदेखील भुयाराचे छत ढासळले होते. आज शहरात पिण्याचे पाणी अन्य कारणांसाठी वापरत आहोत. या पाण्याचा सरकारने योग्य पद्धतीने वापर केल्यास या पाण्याचा उपयोग होईल. सध्या हे पाणी वाहून नदीला मिळत असून, पाणी वाया जात आहे. याचा नागरिकांसाठी उपयोग होण्याची गरज आहे.
– पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.