नेवासा, (प्रतिनिधी) – जैन साधू-साध्वी यांच्या विहार दरम्यान होणारे अपघात आणि साधू ,साध्वी यांच्यावर होणारे हल्ले यावर आ.सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात आवाज उठविलेला होता. त्याअनुषंगाने सोमवारी राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी जैन साधू-साध्वी यांना विहार दरम्यान सुरक्षा व्यवस्था देण्याचे आदेश काढले आहेत.
अखिल भारतीय जैन सोशल फोरम या संघटनेचे अध्यक्ष व सत्यजीत तांबे यांचे निकटचे स्नेही अभिजीत लुणिया यांनी यासंदर्भात सत्यजित तांबे यांच्या समवेत चर्चा केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित केला होता.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन साधू- साध्वींना विहारादरम्यान सुरक्षा प्रधान करण्याबाबत उचित आदेश काढण्याचे सुचविले होते.
त्याअनुसार राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती यांनी एका आदेशाद्वारे राज्यातील सर्व पोलीस विभागास या सूचना दिलेल्या आहेत.
जैन सोशल फोरमचे अध्यक्ष अभिजीत लुणिया म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित होता.आमदार तांबे हे विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळास घेऊन लुणिया यांनी त्यांचेसमवेत चर्चा केली.
जैन साधू- साध्वींना सुरक्षा देण्याबाबत विनंती केली होती. त्यावर तांबे यांनी अधिवेशनातच हा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर लगोलाग गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत अधिवेशनातच याला तत्वतः मान्यता दिली होती.
त्यानंतरआज राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती यांनी आदेश काढल्याने समाजात एक आनंदाचे वातावरण तयार झाले. जैन समाजाच्यावतीने लवकरच आमदार तांबे यांचा भव्य असा सत्कार करण्यात येणार असल्याचेही लुणिया यांनी सांगितले.