शेतकऱ्याला अपघात विमाचे 2 लाख रुपये देण्याचे आदेश; कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

वाहन परवाना नसल्याचे कारण दाखवत नाकारला क्‍लेम

पुणे – वाहन परवाना नसल्याचे कारण दाखवत शेतकऱ्याचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. क्‍लेमची रक्‍कम 2 लाख रुपये, त्यावर शेतकऱ्याचा मृत्यू झालेल्या तारखेपासून म्हणजे 23 जून 2016 पासून वार्षिक 7 टक्‍के व्याज आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 25 हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश अध्यक्ष शुभांगी दुनाखे आणि सदस्य अनिल जवळेकर यांनी दिला आहे.

याबाबत आशा प्रदीप पठारे (रा. खामगाव, ता. जुन्नर) यांनी 2 जुलै 2018 रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी, शिवाजीनगर आणि तालुका कृषी उत्पन्न अधिकारी, जुन्नर यांच्याविरोधात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी अतिरिक्‍त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे पती प्रदीप अनंत पठारे शेतकरी होते. ते 17 जून 2016 रोजी दुचाकीने प्रवास करत असताना पिक-अप जीपने पाठीमागील बाजून धडक दिली. त्या अपघातानंतर उपचार घेत असताना प्रदीप यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदारांनी तलाठ्याकडे आवश्‍यक कागदपत्रांसह दावा दाखल केला. परंतु, विमा कंपनीने त्यांचा क्‍लेम नाकारला नाही अथवा मंजुरही केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

क्‍लेमचे 2 लाख रुपये 15 टक्‍के वार्षिक व्याजाने, दंडात्मक नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 25 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी केली. यास लेखी जबाब दाखल करून विमा कंपनीने विरोध केला. विम्याच्या अटीनुसार गाडी चालविणाऱ्या व्यक्‍तीकडे वाहन परवाना असणे आवश्‍यक आहे. मयत प्रदीप यांच्याकडे परवाना नव्हता. त्यामुळे त्यांचा क्‍लेम नाकारल्याचे कंपनीने सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकल्यानंतर उताऱ्यावरून मयत शेतकरी असल्याचे सिद्ध होते. त्यातच प्रथम खबरी अहवालानुसार प्रदीप मित्रांसह करवंद घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी कल्याणकडून आलेल्या जीपने धडक दिली. त्यामध्ये करवंद विकणाऱ्या दोन्ही महिला जागीच मयत झाल्या. तर, प्रदीप यांचा उपचारादरम्यान 23 जून 2016 रोजी मृत्यू झाला. त्यावरून पठारे हे दुचाकी चालवत असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे क्‍लेम नाकारणे योग्य नसल्याचा निष्कर्ष काढत मंचाने वरील आदेश दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)