आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला अनुपस्थित नगरसेवकांना नोटीस बजावण्याचे फर्मान

पिंपरी – राज्याचे पर्यटनमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे दोन नगरसेवक गैरहजर होते. शहरात शिवसेनेचे अवघे नऊ नगरसेवक आहेत त्यापैकीही दोन जण गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले होते. ठाकरे यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस द्या, अशी सूचना केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्याशी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, राहुल कलाटे, सचिन भोसले, निलेश बारणे, अमित गावडे, मीनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे बैठकीस अनुपस्थित होते. त्यावर ठाकरे यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस द्या, अशी सूचना केली.

याबाबत बोलताना शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी पुण्यात शहरातील आढावा बैठक घेतली. या बैठकीस येणार नसल्याचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी कळविले होते. मात्र, अश्विनी चिंचवडे यांनी तशी कोणतीही कल्पना दिली नव्हती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.