नवी दिल्ली – देशातील सर्व रुग्णालये व नर्सिंग होमचे फायर ऑडिट करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केला आहे.
या सर्व रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनेच्या संबंधात योग्य काळजी घेण्यात आलेली आहे की नाही याची पाहणी करण्याच्या सूचनाही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना करण्यात आल्या आहेत.
सध्याच्या उन्हाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात आगी लागत असतात, त्याची झळ रुग्णालयांना पोहोचू नये यासाठी विशेष जागरूक राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
अलीकडेच देशाच्या काही भागात रुग्णालयांना लागलेल्या आगीत कोविडचेही पेशंट दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. हे ऑडिट सर्व सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांनाही बंधनकारक करण्यात आले आहे.