नगर -जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे(कलम 37,1) आदेश लागू केले आहेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नये. कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
गत वर्षीही गणेशोत्सवावर करोनाचे सावट होते. ते यंदाही कायम आहे. शासनाच्या आवाहनानुसार गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मात्र, तरीही नगर शहर व जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
प्रत्येक तालुक्यात स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त देण्यात येणार आहेत. तर, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी व एक हजार होमगार्ड आदींचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे.
नगर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गणेशोत्सवावर नजर राहणार आहे. नगर शहरात प्रशासनाने वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी एकमताने हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.
गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. कोणी मिरवणुका काढू नये. कोविड नियमांचे पालन करावे.
– मनोज पाटील,पोलीस अधीक्षक, नगर