स्वातंत्र्याच्या हक्कावर कुणीही गदा आणू शकत नाही
सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनोजीया यांची सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांची जामीनावर सुटका करतानाच स्वातंत्र्याच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिल्याने ती योगी सरकारला मिळालेली एक मोठी चपराक मानली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या इंदिरा बॅनर्जी, आणि न्या अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने आज त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना कनोजीया यांच्या सुटकेचे आदेश दिले. तथापी आम्ही कनोजीया यांना जामीन मंजुर केला असला तरी संबंधीत पत्रकाराने सोशल मिडीयावर जी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे त्याच्याशी आम्हीं सहमत नाहीं असेही कोर्टाने नमूद केले आहे. पत्रकार कनोजीया यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे आणि ती घटनाबाह्य आहे असा आक्षेप घेत त्यांच्या पत्नी जगीशा अरोरा यांनी काल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने आज तातडीची सुनावणी घेतली आणि त्यांची जामीनावर सुटका केली.
एका महिलेने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्या संबंधात ही महिला पत्रकारांशी जे काही बोलली त्याचा व्हिडीओ कनोजीया यांनी सोशल मिडीयावर शेअर केला त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.