फलटण बसस्थानकातील प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्याचा आदेश

फलटण – फलटण बसस्थानकाची दुरवस्था झाली असून तेथील कामे तातडीने सुरू करण्याचा आदेश परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला दिला. फलटण बसस्थानकातील प्रलंबित कामांबाबत फलटण बाजार समितीच्या सभागृहात रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत विभागीय परिवहन अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात परिवहन विभागाच्या विभागीय अभियंता प्रियांका काशीद यांनी तातडीने काम सुरू करण्याची सूचना ठेकेदाराला दिल्या.

फलटण एसटी बसस्थानक सुस्थितीत करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासावे लागेल, असा इशारा रघुनाथराजे यांनी दिला. बैठकीस फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, दिलीप शिंदे, दादासाहेब चोरमले, प्रियांका कशीद, कनिष्ठ अभियंता पूनम सुतार उपस्थित होत्या. बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत अनेक लेखी तक्रारी आल्या होत्या.

बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट आहे. आतापर्यंत झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून ड्रेनेज, कॉंक्रिटीकरण व इमारतीची डागडुजी झालेली नाही. याबाबतच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. दुपारी 12 वाजता बोलावण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाच्या विभागीय अभियंता प्रियांका काशीद या गैरहजर राहिल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तीन तास थांबवून ठेवले. अखेर काशीद या 3 वाजता बैठकीत हजर झाल्या. त्यानंतर रघुनाथराजे यांनी परिवहन विभागास तत्काळ काम करण्याचे निर्देश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.