व्याजदराच्या सवलत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकारी बँकांना आदेश द्या

राजू शेट्टी यांची सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी)- इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायातील विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग,प्रोसेस, अ‍ॅटोलूम इ.वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होणेसाठी सहकारी बँकांना आदेश करणेत यावेत अशी मागणी राज्याचे सहकारमंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.

कोविड-19 च्या संकटाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसाच्या प्रभावाने जनता जीवाच्या आकांताने भयभित झाली आहे. अशा भयंकर परिस्थितीत सरकार व प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. आपल्या सतर्क व सक्षम प्रयत्नाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध उपाय योजनांनी परिस्थिती नियंत्रणात आणणे हे जसे महत्वाचे तसे विस्कळीत झालेले जनजीवन व उद्योग-व्यापार सुरळीत करून ते पुर्वपदावर आणणेही तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे. या आपत्तीच्या काळात संचारबंदी, लॉकडाऊनचे आदेश देणेत आले. यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार जिथल्या तिथं ठप्प झाले. पॉवरलुमच्या चक्रावर चालणा-या वस्त्रनगरीची जनता हतबल झाली. यात पॉवरलुमधारकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले व अजूनही होत आहे. गेल्या काही वर्षापासून मंदी, महागाईमुळे पॉवरलुम उद्योग मेटाकुटीस आला असतानाच या कोरोनाने धंद्याची व उद्योजकांची अक्षरश: वाट लावली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगाला मदत म्हणून बँक कर्जांचे 6 महिन्यांचे हप्ते न भरण्याचा शासन निर्णय (जीआर) केला.

लघु उद्योग सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी शासन कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असते. सध्या दुग्ध व इतर उद्योगाला 11.25 दराने कर्ज दिले जात होते सद्यपरिस्थितीत बॅकांनी व्याज दर कमी करून 8.25%व्याज दर करून उद्योगाला आधार दिला आहे . वस्त्रोद्योग हा ही लघुउद्योगच आहे. शेतीबरोबर सर्वात जास्त रोजगार देणारा, विविध करांतून शासनाला हजारो करोडोंचा महसूल देणारा व निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणा-या या लघु उद्योगाला आता कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणेची गरज आहे. आपण या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने व सकारात्मक विचार करून या वस्त्रोद्योगाला त्याच्या पडत्या काळात सावरणेसाठी विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम इ.वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दरात सवलत योजनेची अंमलबजावणी करणेबाबत सहकारी बॅंकाना आदेश करण्याची मागणी केली. यावेळी प्रमोद मुसळे, अमोल डाके, प्रशांत सपाटे, किरण पवार, आण्णा दबडे, सुशिल पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.