करोना प्रसाराबद्दल विरोधी लिखाण करणाऱ्यांवर इजिप्तमध्ये दडपशाही

 

कैरो – करोनाच्या प्रसारावरून इजिप्तमधल्या सदोष वैद्यकीय व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर तेथील सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट होत आहे. या संबंधात लेख लिहिणाऱ्या डॉक्‍टरला तेथे काल अटक करण्यात आली असून करोना प्रसाराच्या विरोधातील औषध सामग्रीची कमतरता असल्याची ऑनलाइन तक्रार करणाऱ्याला एका औषध विक्रेत्यालाही तेथे अटक करण्यात आली आहे.

इजिप्तमधील करोनाग्रस्तांचा आकडा छापल्याबद्दल एका संपादकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इजिप्तमध्ये करोनाच्या केसेस वाढत आहेत. त्याला सरकारी ढिलाई जबाबदार असल्याची टीका तेथील सरकारच्या विरोधात सुरू झाल्यानंतर तो आवाज दाबून टाकण्याचे चौफेर प्रयत्न आता तेथील सरकारने हाती घेतले आहेत. अबदेल फतह अल सिस्सी यांच्या नेतृत्वाखाली तेथे सरकार कार्यरत असून त्यांच्या या दडपशाहीच्या विरोधात आता आवाज उठवला जात आहे.

गेल्या तीन महिन्यात तेथे किमान दहा डॉक्‍टर आणि सहा पत्रकारांना या संबंधात अटक करण्यात आल्याची माहिती काही सामाजिक संघटनांनी दिली आहे. करोनाच्या संबंधात कोणतीही माहिती बाहेर दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची तक्रार तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही दिली आहे. अरब जगतात सर्वाधिक करोना रुग्ण इजिप्तमध्ये आढळून येत असून तेथील करोनाग्रस्तांचा जाहीर झालेला आकडा 76 हजार 253 इतका आहे. पण प्रत्यक्षात ही संख्या खूपच अधिक असल्याचे काहीचे म्हणणे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.