टोकियो – करोना साथीमुळे जुलैमध्ये कशी परिस्थिती असेल, तसेच काही विपरीत गोष्टी घडल्या तर त्याचा फटका देशवासीयांनाही बसणार आहे, त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकला पुन्हा एकदा विरोध वाढताना दिसत आहे. मात्र, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेळापत्रकानुसारच पार पडेल, असा दावा संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी केला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा येत्या 23 जुलैपासून सुरू होत असून, यात 11 हजार क्रीडापटूंसह 10 हजार अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, प्रक्षेपण कर्मचारी, पुरस्कर्ते, सामनाधिकारी, विशेष अतिथी यांचा समावेश असेल.
24 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत 4400 क्रीडापटू अपेक्षित आहेत. ऑलिम्पिकसाठी परदेशी प्रेक्षकांना परवागी देण्याचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवण्यात येईल.
नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 80 टक्के जपानी नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. स्पर्धेविरोधात जनमत एकवटत असून अनेक ठिकाणी निदर्शऩेही होत आहेत.