पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला मविआचा विरोध; अंबादास दानवेंना घेतलं ताब्यात

Ambadas Danve| पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये येणार आहेत. परंतु महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत महाविकास आघाडीने विरोध केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.
मोदी यांच्या या दौऱ्याला विरोध करत अंबादास दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन विमानतळाच्या दिशेने निघाले होते. मात्र अंबादास दानवे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून विमानतळाबाहेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून हातात बॅनर घेऊन निषेध नोंदवला.
पीएम मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
दरम्यान, पीएम मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होत ते हेलिकॉप्टरने जळगावकडे रवाना होणार आहेत. पीएम मोदी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येणार असल्यामुळे महाविकास आघाडीने त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन केले. ते आज संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यात ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रं वाटली जाणार आहेत. यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र राज्यातील महिला सुरक्षतेच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने हे आंदोलन पुकारलं होतं.
हेही वाचा:
‘1000 Babies’चा टीझर रिलीज; नीना गुप्ता यांचा लुक पाहून व्हाल थक्क





