निवडणुकीच्या काळात ‘पीएम मोदी’ चित्रपटावर बंदी घालावी – मनसे

मुंबई – काँग्रेसच्या विरोधानंतर मनसेने देखील ‘पीएम मोदी’ चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या काळात चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलने विरोध करू, असा इशारा मनसेच्या कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन सर्वानी करणे अपेक्षित आहे. परंतु सत्ताधारी पक्षच आचारसंहितेला सुरुंग लावत असेल तर रस्त्यावर उतरून खळ्ळ-खट्याक पद्धतीने आंदोलन करू, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या. काँग्रेसने देखील यापूर्वीच निवडणुकीच्या काळात ‘पीएम मोदी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

बहुचर्चित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंत मोदींचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. समाजातील आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपले योगदान देत असल्याचा समज या सिनेमाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक द्यायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. तसेच या चित्रपटातील गाणी ही जावेद अख्तर यांनी लिहिल्याचे चित्रपटाच्या पोस्टरवर म्हंटले आहे. मात्र प्रत्यक्षात काल जावेद अख्तर यांनी या चित्रपटासाठी कोणतेही गीत लिहिले नसल्याचे जाहीर केले आहे, या गोष्टीचा उल्लेख ठाकरे यांनी केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.