“मीनाक्षी’च्या विस्तारवाढीस विरोध

प्रदूषण मंडळाचे आदेश धाब्यावर

या मीनाक्षी फॅरो कंपनीत अनेक वेळा स्फोट झाले असून गेल्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या भीषण स्फोटात परप्रांतीय चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अनेक कामगार जखमी झाले होते. अशा प्रकारचे सतत अपघात होत आहेत. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र, कंपनी एक महिना बंद ठेवत संबंधित कंपनीने पुन्हा उत्पादन सुरू केले आहे.

यवत – दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथील कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या मीनाक्षी फॅरो कंपनीला मॅन्युफॅक्‍चरिंग युनिटचा विस्तारवाढ करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने विरोध केला आहे. पुनर्वसन व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे व प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

भांडगाव येथील भांडगाव-खोर जिल्हा मार्गावर मीनाक्षी फॅरो प्रा. लि. ही कंपनी असून या कंपनीत भंगारापासून लोखंड उत्पादित करण्यात येत आहे. ही कंपनी येथे मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या कंपनीच्या निघणाऱ्या धुरापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे भांडगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर या धुराच्या प्रदूषणामुळे शेतीतील पिकेही त्यापासून सुटलेली नाहीत. या प्रदूषणामुळे दि.16 ऑगस्ट 2018 रोजी भांडगाव ग्रामपंचायतीने कंपनी प्रशासनाला होणारे प्रदूषण बंद करण्याबाबत पत्र दिले होते मात्र कंपनीने प्रदूषणाबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

उलट मीनाक्षी फॅरो कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विस्तारवाढ करण्यासाठी परवानगी मागितली आहे. याबाबत नुकतीच पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात आली होती, त्या जनसूनवणीस भांडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या जनसूनवणीत भांडगाव ग्रामस्थांनी या कंपनीला विस्तारवाढ करण्यास विरोध दर्शवला आहे. माजी उपसरपंच रवींद्र दोरगे म्हणाले की, स्थानिक ग्रामस्थांना व नागरिकांना या कंपनीच्या प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वप्रथम आमचे कर्तव्य आहे. त्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)