fbpx

कर्नाटकात मराठा विकास महामंडळला विरोध; 5 डिसेंबरला कर्नाटक बंद?

- कन्नडीगांच्या संघटनांचा 5 डिसेंबरला कर्नाटक बंद - बंद मागे घेण्याचे येडियुरप्पांचे आवाहन

बंगलुरू – कर्नाटक सरकारने मराठ्यांच्या विकासासाठी स्वतंत्र मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर तेथील वातावरण तापले असून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कन्नड भाषिकांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्यांनी येत्या 5 डिसेंबरला त्यासाठी कर्नाटक बंदचे आयोजन केले आहे. तथापि हा बंद मागे घेण्यात यावा असे आवाहन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केले आहे. बंद जबरदस्तीने पाळण्याचा प्रयत्न केला गेल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हे विकास महामंडळ मराठी भाषिकांसाठी नव्हे तर कर्नाटकातील मराठा समाजाच्या लोकांच्या हितासाठी स्थापन केले जात आहे. राज्यातील प्रत्येक घटकांची काळजी घेणे हे राज्य सरकारचे कामच असते. त्यामुळे या महामंडळाविषयी कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत असे आवाहनही त्यांनी केले.

सक्तीने बंद पाळण्याचा प्रयत्न केला तर संबंधीतांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की कन्नडीगांसाठी जे करणे शक्‍य आहे ते आम्ही करीतच आहोत. त्यामुळे कोणत्याही कारणावरून संपुर्ण राज्याला वेठिला धरण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

लोकांनाहीं ते आवडणार नाही असे ते म्हणाले. हैदोस घालणे, पुतळे जाळणे असे प्रकार सध्या कर्नाटकात केले जात आहेत, ते खपवून घेतले जाणार नाहीत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी कन्नडीगांच्या संघटनांनी सरकारला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तो पर्यंत निर्णय झाला नाहीं तर ठरल्याप्रमाणे 5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंद करण्याचा निर्णय या संघटनांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.