महात्मा गांधींच्या पुतळ्याला इंग्लंडमध्ये विरोध

लंडन – ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मॅंचेस्टरमधील मुख्य चर्चसमोर महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे.

गांधींचा पुतळा उभारण्याच्या विरोधात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी “गांधी मस्ट फॉल’ नावाचे एक अभियान सुरू केले आहे. गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून मॅंचेस्टर मुख्य चर्चसमोर गांधींचा 9 फुटी कास्याचा पुतळा 25 नोव्हेंबरला उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हा निर्णय नगरपरिषदेने रद्द करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

मात्र, स्थानिक प्रशासनाकडून महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याची मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

मॅंचेस्टर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे. त्यामध्ये महात्मा गांधींना “अँटी-ब्लॅक वंशवादी’ असे संबोधले आहे. आफ्रिकेत ब्रिटनच्या शासनाने केलेल्या कारवाईला महात्मा गांधींचा पाठिंबा होता, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. महात्मा गांधी यांनी आफ्रिकी जनतेचा “असभ्य’, “अर्धे मूलनिवासी’, “जंगली’, “घाणेरडे’, “जनावरांसारखे’, असे हिणवले असल्याचे या विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतर्फे प्रतिवर्षी गांधी जयंती अर्थात 2 ऑक्‍टोबर हा दिवस “जागतिक अहिंसा दिन’ अर्थात ‘वर्ल्ड नॉन-व्हॉयलन्स डे’ म्हणून साजरा करण्यासही इंग्लंडमधीलच काही संघटनांनी विरोध केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.