कराड विमानतळ विस्तारीकरणाच्या विरोधात मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; विस्तारीकरणाचा निर्णय रद्द होईपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा

सातारा – कराड विमानतळ विस्तारीकरणाच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विस्तारीकरणामुळे जिल्ह्याच्या विकासाला कोणताही मदत होणार नसून उलट कृष्णा- कोयना काठच्या शेतकरी जनतेला कंगाल करण्यात येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत विस्तारीकरणाचा निर्णय रद्द होणार नाही. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विमानतळ विस्तारीकरणाच्या विरोधात सहा वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारी डॉ.पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी कुटुंबियांसहित मोर्चा काढत ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. दरम्यान, डॉ. पाटणकर यांच्यासह डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

कराड विमानतळाच्या विस्तारीकरण कोणत्याच दृष्टीने लाभदायक नसताना निर्णय घेण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांबरोबरच अनेक वर्ष बागायती क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी उपसासिंचन योजनादेखील बाधित होणार आहे. वास्तविक विस्तारीकरणामुळे तथाकथित विकासाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु याआधी झालेला विकास नामषेश करून नव्याने कोणताही विकास करण्याची क्षमता नसणाऱ्या विशिष्ट प्रकल्पाला विरोध आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या परिसरात डोंगराची उंची पाहता छोटी विमाने उतरविताना धोका पोहचू शकतो. त्यामुळे विस्तारीकरण करून कोणताही हेतू साध्य होणार नसल्यामुळे शासनाने विस्तारीकरणाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

कोरेगाव-पुसेगाव परिसर योग्य
कराड विमानतळाचे विस्तारीकरण करून बागायती शेतकऱ्यांना बाधित न करता कोरेगाव- पुसेगाव परिसरात विमानतळ तयार करण्यात यावे, अशी मागणी डॉ.भारत पाटणकर यांनी केली आहे. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पडीक जमीन आहे. ती जमीन भविष्यात शेतीसाठी उपयुक्त होणार नाही. अशा ठिकाणी विमानतळासह कार्बोहब होण्याइतपत क्षेत्र उपलब्ध आहे. तसेच कराडपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे विमानतळ होणार आहे.

महाबळेश्‍वरला जाण्यासाठीदेखील ते जवळ असणार आहे. त्याचबरोबर भविष्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होताच कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. उत्पादनाची निर्यात करण्यासाठी विमानतळ योग्य ठिकाण आहे, अशी माहिती डॉ.पाटणकर यांनी नमूद केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.