नांदेड : आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध करत तिच्या प्रेमाचा भयानक शेवट जन्मदात्यानीच केला आहे. भावांनी आणि जन्मदात्या आई-वडिलांनीच मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. एवढे नाही तर मुलीची हत्या करुन तिची राख उधळून दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर या क्रूरहत्येची घटना उघडकीस आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी याठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली असून हत्या करण्यात आलेली मुलगी नांदेडमध्ये बीएएमएसच्या तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने वडीलासह भावांनी मिळून मुलीस क्रुरपणे मारहाण करुन हत्या केली. तसेच तिला जाळून तिची राख उधळून लावल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलाचे अपहरण केल्याची माहिती देखील मिळत आहे.
या घटनेमुळे महिपाल पिंपरी गाव दहशतीत आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशीरा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 302 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिष्ठेपोटी आई वडिलांनी मुलीला जीवे मारल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत मुलीचे वडील भाऊ ,मामा, दोन चुलतभाऊ अशा पाच लोकांचा समावेश आहे.
अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. मुलीची तिचे आई-वडील, भाऊ यांनीच हत्या केली. नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी काल रात्री उशीरा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.