नागपूर: उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यासाठी विरोधीपक्षाची आज बैठक पार पडणार आहे. आज दुपारी 12 वाजता रविभवनातील विरोधी पक्षनेत्यांच्या कॉटेजमध्ये बैठक होणार आहे. तर दुपारी 1 वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.
आज सायंकाळी 5 वाजता विरोधी पक्ष नेत्यांसोबत चहापान आयोजित करण्यात आले आहे. यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षनेत्यांसोबत चहापानाची परंपरा आहे. यापूर्वीचे एखाद-दोन अपवाद वगळता विरोधी पक्षाकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात येतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासोबतच विविध कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. भाजपकडून विविध पातळ्यांवर याचा विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या चहापानाला जाऊ नये, अशी भूमिका बहुतांश सदस्यांनी घेतली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची दुपारी 12 वाजता रविभवनातील कॉटेजमध्ये बैठक होणार आहे. यात अधिवेशनात उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध मुद्द्यांसह चहापानाच्या बहिष्काराबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते आहे.