‘वॉटर बॉटल’ खरेदीला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध

मागणी नसताना खरेदी कोणासाठी?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाने तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून “वॉटर बॉटल’ खरेदी करण्याचा घातलेला “घाट’ सर्वपक्षीय नेत्यांनी उधळून लावण्याचेच स्पष्ट केले आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक अथवा लोकप्रतिनिधींची मागणी नसतानाही ही खरेदी कोणाच्या भल्यासाठी केली जात आहे? असा प्रश्‍न सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित केला आहे.

ही खरेदी करू नये, अशी मागणी करत विरोधी पक्षनेत्यांसह, भाजपाचे काही नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांनी आयुक्तांना लेखी निवेदने दिली आहेत. महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टील आणि कॉपरच्या वॉटर बॉटल देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या वॉटर बॉटलच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या मंडळाच्या प्रशासन विभागात सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठेकेदाराची चौकशी सुरू आहे, त्या ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून ही खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत “दैनिक प्रभात’मध्ये शनिवारच्या (दि. 15) अंकात वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेत हा विषय चर्चेचा बनला होता. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या उधळपट्टीला विरोध दर्शवित हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

शिक्षण मंडळाकडे विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल पुरविण्यात यावी, अशी मागणी कोणीही केलेली नाही. मात्र वॉटर बॉटलच्या माध्यमातून आर्थिक हित साधण्याची कल्पना एक अधिकारी, ठेकेदार यांच्या डोक्‍यात आली आणि त्यांनी ही कल्पना मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या “मना’मध्ये उतरविली. यानंतर प्रशासकीय मान्यता घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी मान्यता घेऊन जून महिन्यात “वॉटर बॉटल’ बिनबोभाटपणे वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आत्ताच खरेदी होणार नाही’ असे सांगत विरोध कमी करायचा आणि जूनमध्ये “इस्पित’ साध्य करायचे असा यामागे डाव असल्याचे बोलले जात आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया नाहीच
“वॉटर बॉटल’ संदर्भात शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करून तसेच मंडळाच्या कार्यालयात जावूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. कार्यालयात गेले असता मिटिंगसाठी “मॅडम’ बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. तर फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही. शिंदे यांच्याकडून प्रतिक्रिया उपलब्ध होत नसल्याचे या विषयाबात संशय अधिकच वाढत चालला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.