विरोधी पक्ष नेत्यांनाही हवे मोठे दालन

महापौर, स्थायी समिती अध्यक्षांच्या दालन विस्तारीकरणाबाबत मागविली माहिती

पिंपरी –
महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनांप्रमाणे आपल्याही दालनाचा विस्तार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते यांनी केली आहे. तसेच महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाच्या विस्ताराचे काम लोकसभा निवडणूक आचारसंहितेत कसे सुरू करण्यात आले? त्याला कधी मंजुरी देण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्‍तांकडे मागितली आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी तिसऱ्या मजल्यावर असलेले दालन अपुरे पडत असल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दालनाच्या विस्तारीकरणाची मागणी केली होती. त्याबाबत आंदोलनात्मक पवित्राही घेतला होता. त्यांनी चक्क महापौरांच्या दालनासमोरच त्यासाठी ठिय्या मांडला होता. त्यानंतर, विरोधी पक्षनेत्यांसाठी दुसऱ्या मजल्यावर दालनाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, तिसऱ्या मजल्यावरच दालन मिळावे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी कायम होती. दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनाचा विस्तार झाला. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाचे विस्तारीकरण नुकतेच पूर्ण झाले. तर, महापौरांच्या दालनाचे विस्तारीकरण अद्याप अपूर्ण आहे.

सध्याही विरोधी पक्षनेत्यांचे दालन तिसऱ्या मजल्यावरच आहे. तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना बसण्यासाठी अपुरी जागा पडत आहे. त्यामुळे दालनाचेही विस्तारीकरण करावे, अशी मागणी साने यांनी केली आहे. त्यांनी याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात साने यांनी म्हटले आहे की, “”भाजप पदाधिकाऱ्यांच्या महापालिकेतील काही कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे. महापालिका प्रशासनाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर एवढा खर्च केलाच आहे तर अजून थोडा खर्च करून या कार्यालयांच्या अँटी चेंबरमध्ये स्वतंत्र बेडचीही व्यवस्था करावी.

भाजपचे पदाधिकारी सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत काम करीत असतात. त्यामुळे त्यांना तेथेच विश्रांतीही घेता येईल. आपण जर बेडची व्यवस्था करणार नसाल तर मी स्वत: बेडची व्यवस्था करण्यास तयार आहे.” असा उपरोधिक टोलाही लगावला आहे. याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, ‘स्वच्छ भारत अभियानात महापालिका सहभागी आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनात स्वच्छतागृह केले तर चुकीचे वाटत नाही. दालनात बेडची व्यवस्था करणे ही भाजपची संस्कृती नाही. ती त्यांची संस्कृती असेल. दालनाचे विस्तारीकरण केले म्हणून टीका करीत आहेत. तर, मग विरोधी पक्षनेत्यांना कशाला विस्तारित दालन हवे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.