मुंबई – मुंबई बँकेचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला अन् तिकडे विधान परिषदचे विरोधीपक्षनेते आणि बँकेचे संचालक म्हणून निवडून आलेल्या प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने “मजूर” म्हणून अपात्र ठरवले आहे. १९९७ सालापासून मुंबई बँकेचे संचालक पदी प्रवीण दरेकर “मजूर” या प्रवर्गातून निवडून येत होते. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. त्यातच आता त्यांच्या विरोधीपक्षनेते पदावरही संकट असल्याचं दिसून येत आहे.
सहकार कायदा १९६० च्या २०२१ च्या पुस्तकात पान ३६९ वर सहकार कायदा ७८ अ मध्ये मजूर किंवा सदस्य अपात्रतेचा मुद्दा सुस्पष्ट आहे. या कलमातील तरतुदीनुसार अपात्र सदस्य जो बँकिंग क्षेत्रातील आहे तो १ वर्षाकरता कोणत्याही व्यवस्थेतून सदस्य राहू शकत नाही, अशी स्पष्ट तरतूद दिलेली आहे, अशी माहिती आपचे धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी अपात्र ठरविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. लोकांची फसवणूक करणारे, स्वतःला मजूर म्हणवणारे आणि प्रतिज्ञापत्रात उद्योजक दाखवणार्या प्रविण दरेकर यांना सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी तात्काळ विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
भाजपचा जबाबदार नेता जनतेच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करतोय. त्यामुळे भाजपकडे नैतिकता आहे का ? अशा खोचक सवाल महेश तपासे यांनी विचारला आहे.