अमरेली – करोना चाचण्या घेण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करा या मागणीसाठी येथील सरकारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन करणारे गुजरात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते परेश धनानी यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.
धनानी यांनी असा आरोप केला की येथे ही प्रयोगशाळा उभारण्यास अनुमती दिली जावी अशी मागणी आपण सातत्याने केली आहे पण त्याकडे राज्य सरकारने लक्ष दिले नाहीं म्हणून आपल्याला हे धरणे आंदोलन करावे लागले.
अमरेलीच्या सरकारी रूग्णालयात करोनाची चाचणी घेण्यासाठी लॅबरोटरीच नाहीं. त्यामुळे करोना रूग्णांच्या चाचण्याच होत नाहीत. त्यामुळे रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होऊ लागली आहे असा त्यांचा आरोप आहे. एकूणच गुजरात मधील करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान धनानी यांना पोलिसांनी सायंकाळी मुक्त केले.