डेहराडून – भाजपमधून हकालपट्टी झालेले उत्तराखंडचे मंत्री हरकसिंह रावत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या फेरप्रवेशाला कॉंग्रेसमधून होणारा विरोध वाढत आहे.
हरक यांची भाजपने नुकतीच पक्षातून आणि मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, उत्तराखंडमधील कॉंग्रेस नेते हरक यांनी 2016 मध्ये केलेली बंडखोरी विसरण्यास तयार नाहीत.
त्यावर्षी हरक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारविरोधात बंड केले. त्यामुळे त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना फेरप्रवेश दिल्यास जनतेला काय सांगणार, असा सवाल काही कॉंग्रेस नेते करत आहेत.
फेरप्रवेश सोपा नसल्याचे ध्यानात आल्याने हरक यांनी बुधवारी दिल्लीला धाव घेतली. तिथे त्यांनी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. मात्र, हरक यांना अद्याप कॉंग्रेसकडून कुठला सिग्नल मिळाला नसल्याचे समजते. त्यामुळे तूर्त तरी उत्तराखंडमधील वजनदार नेते असणाऱ्या हरक यांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालेली दिसते.