नवी दिल्ली – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित रोकड प्रकरणी न्याय्य चौकशी केली जावी. तसेच, वर्मा यांना हटवण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया चालवली जावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.
वर्मांशी संबंधित प्रकरण संसदेत लावून धरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. त्या प्रकरणावर संसद भवनाबाहेर पत्रकारांशी स्वतंत्रपणे बोलताना विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
एकही पैसा आढळला नसताना विरोधकांना तुरूंगात पाठवले जाते. मात्र, देशाच्या इतिहासात प्रथमच न्यायाधीशांच्या निवासस्थानी नोटांची बंडले सापडली. कोट्यवधी रूपये सापडल्यानंतरही कुठला तपास होताना दिसत नाही. वर्मा यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी भूमिका आपचे नेते संजय सिंह यांनी मांडली.
रोकड प्रकरणावर केंद्र सरकारने संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी केली.