बारामती लोकसभेचा विरोधी उमेदवार गुलदस्त्यातच

खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी भाजपची कुटनीती यशस्वी ठरणार?

– रोहन मुजूमदार

राज्यासह जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार “फिक्‍स’ असल्याने त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. तर पवारांचा गड भेदण्यासाठी यंदा भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांचा उमेदवारच निश्‍चित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

युती होण्याआगोदर पालघरऐवजी बारामती शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दाखवली होती; परंतु युती होण्यासाठी भाजपने पालघरवर पाणी सोडले. हे पाणी सोडण्याआधी पुण्यातील कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री यांनी बारामती लोकसभा कोणत्याही परिस्थितीत काबीज करणारच असा चंग बांधला होता. त्यामुळे भाजप मित्रपक्षातील रासपचे महादेव जानकर की भाजपच्या कोण्या बड्या नेत्याला या मतदारसंघातून तिकीट देणार हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्‍न यामुळे बारामती लोकसभा मतदासंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा गड भेदण्यात महादेव जानकर बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. मात्र, काही फरकारने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळे सुळे यांना टक्कर देण्यात आपल्यात हिंमत असल्याचे भाजपने ओळखले व त्यादृष्टीने यंदाही मोहीम फत्ते करण्याचा भाजप नेत्यांनी चंग बांधला असून त्यादृष्टीने हे कुटनीतीद्वारे “गेम’ खेळत आहेत. मात्र, उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर त्यांचा “गेम’ यशस्वी ठरणार की त्यांच्यावरच उलटणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे. तत्पूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील निवडणुकीसारखी दैना होऊ नये म्हणून लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केल असून मतदारसंघातील प्रत्येक गावे-वाड्यावस्त्यांनी भेटी देऊन तेथील समस्या, लोकांचे प्रश्‍न सोडवून देण्यावर विशेष भर दिला असून यातील सर्वाधिक वेळ त्यांनी इंदापूर तालुक्‍यावर दिला आहे.

एकूणच 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षभरापासूनच तयारी सुरू केली. त्या तुलनेत विरोधी पक्षांची तयारी अत्यल्प आहे. त्याचवेळी सध्याच्या सरकारवर असलेल्या नाराजीचा प्रचंड फटका विरोधी उमेदवाराला बसू शकतो. मराठा समाजाला आरक्षण देऊन धनगर समाजाला मात्र ताटकळत ठेवणेही भाजप उमेदवाराला न परवडणारे आहे. त्यामुळे भाजप या मतदारासंघाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

पायावर धोंडा की पाठीशी उभे राहणार

धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मंत्रिपद घेणार नाही असे सांगणारे जानकर आरक्षण न मिळताच मंत्रिपद घेऊन पुढे धनगर समाजामुळे मी मंत्री झालेलो नसल्याचे सांगतात. ही बाब धनगर समाजाला खटकणारी आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या निवडणुकीत आरक्षण मिळेल या आशेवर बारामतीसह, इंदापूर, दौंडमध्ये धनगर समाजाने जानकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. मात्र, आताची परिस्थिती पाहता धनगर समाजाने भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजाची भाजप सरकारवर नाराजी आहे. या सर्व बाबींचा फटका महादेव जानकर यांना बसू शकतो. त्याचवेळी मतदारसंघात जनसंपर्कच नसल्याने ऐन निवडणूक काळात जानकरांची दमछाक होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपला पक्के माहीत आहे. त्यामुळे पुन्हा जानकरांना तिकीट देऊन भाजप पायावर धोंडा पाडणार की त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार यासाठी वेट अँड वॉचची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

हे ठरणार कळीचे मुद्दे

भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच झालेला नाही. जीएसटीमुळे व्यापारीवर्ग त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. नोटाबंदीने अनेक कंपन्या बंद पडून बेरोजगारी वाढली अशा अनेक मुद्‌द्‌यांचा उहापोह या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून होईल. त्याचबरोबर पवारांचा गड असलेल्या बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील 22 गावे गेल्या 50 वर्षांपासून पाण्यासाठी झगडत असून त्यांनी यंदातर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा संकल्प सोडला आहे, त्यामुळे विरोधक याचा फायदा घेणार, यात दुमत नाही त्यामुळे या मुद्द्यांचा पवार कुटुंब कसा सामना करणार हे पाहणे लक्ष्यवेधी राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)