शुल्कवाढीवरून विरोध आणि मतांतरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा
शुल्क समितीच्या बैठकीपुढे मांडणार : कुलगुरू

पुणे  –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शुल्कवाढीच्या विषयावरुन अधिसभेत जोरदार चर्चा झाली. शुल्कवाढीला काही अधिसभा सदस्यांनी विरोध केला. याउलट काही सदस्यांनी सध्याची महाविद्यालय परिस्थिती पाहता शुल्कवाढ आवश्‍यक असल्याचे म्हटले. त्यावरून सदस्यांमध्ये मतांतरे होत असताना कुलगुरूंनी समन्वयाची भूमिका घेत हा विषय शुल्क समितीच्या बैठकीपुढे मांडला जाईल. त्यात सर्व घटकांची मते विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, गेल्या सात-आठ वर्षांपासून महाविद्यालयांना विविध अभ्यासक्रमांचे शुल्क वाढ न केल्याने संस्था अडचणीत येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा अधिसभा सदस्य संतोष ढोरे म्हणाले, “शिक्षणसंस्था या पैसे कमावण्याचे साधन नाहीत. त्यामुळे विद्यार्थीहिताचा विचार करून कोणत्याही परिस्थितीत शुल्कवाढीचा निर्णय घेऊ नये. हा ठराव अमान्य करावा. डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, “संस्थेला महाविद्यालय सुरू ठेवण्यासाठी शुल्कवाढ आवश्‍यक आहे. मात्र कोणताही विरोध न होता शुल्कासंदर्भात विद्यापीठाने निर्णय घ्यावा.’
स्थगन प्रस्ताव एकच, पण सर्व प्रस्तावांवर चर्चा
अधिसभेत एकूण 18 स्थगन प्रस्ताव आले आहेत. मात्र नव्या परिनियमानुसार अधिसभेत एकच स्थगन प्रस्ताव मांडता येणार असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काही अधिसभा सदस्यांनी सर्वच स्थगन प्रस्ताव ग्राह्य धरण्याची मागणी केली. अधिसभा ही समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी अधिकार मंडळ आहे. त्यामुळे सर्वच स्थगन प्रस्ताव महत्त्वाचे आहे, याकडे प्राचार्य संजय खरात व संतोष ढोरे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर कुलगुरूंनी नियमानुसार एकच स्थगन प्रस्ताव मान्य करण्यात येतील. सभागृहाचा विचार करून सर्वच स्थगन प्रस्तावावर मात्र चर्चा होईल, असे सांगितल्याने या विषयावर पडदा पडला.

शुल्कवाढीचा विषय संवेदनशील आहे. हा विषय शुल्क समितीपुढे मांडला जाईल. त्यात विद्यार्थी संघटना, प्राध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांच्या प्रतिनिधींना मते विचारात घेऊन सध्याची परिस्थिती पाहता योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू.

Leave A Reply

Your email address will not be published.