दहावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध; पालक सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

 

काहींकडून निर्णयाचे स्वागत निर्णयाबद्दल मतमतांतरे

पुणे – करोनामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था आहे. दरम्यान, काही मंडळींनी शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

सीबीएसई, सीआयएससीई आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयता दहावी परीक्षाही रद्द केल्या. बारावीच्या परीक्षा घेण्यावर मात्र सर्वच बोर्ड ठाम आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असतात. यावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजून येण्यास मदत होते. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या परिस्थितिजन्य निर्णयाचे अभाविप व इतरांनी स्वागतही केले.

तसेच, काहींनी नाराजीही व्यक्‍त केली. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक संभ्रमात आहेत व काही प्रश्‍नदेखील उपस्थित झाले आहेत. राज्य शासनाने या विविध प्रश्‍नांवर त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु याबाबत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे या परीक्षेबाबतही संभ्रम आहे.

शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थीहिताच्या विरोधी आहे. अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचे सरसकट निकाल लावण्याचे निकष ठरविल्यास त्यावर शाळा व पालक यांच्यात एकमत होणे मुश्‍कील आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना अनेक अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
– प्रा. अविनाश ताकवले, अध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल


महाराष्ट्र बोर्डासह इतर बोर्डानी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करून काहीच उपयोग झाला नाही. बारावीच्या परीक्षा होणार आहेत मग दहावीच्या परीक्षा का घेता येत नाही, हा मोठा प्रश्‍न आहे. शाळास्तरावर काही परीक्षाच झाल्या नसल्याने अंतर्गत मूल्यमापन करणे अवघड आहे. त्यामुळे शासनाच्या परीक्षा रद्दच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
– धनंजय कुलकर्णी, अभ्यासक, शिक्षण क्षेत्र


दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सर्व तयारी ठेवली होती. परीक्षेसाठी उत्तरपत्रिका व इतर आवश्‍यक साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आले होते. परीक्षा रद्द झाल्यामुळे सर्वत्र निराशा पसरली आहे.
– हरिश्‍चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा


दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने केले जाईल? राज्यातील अनेक विद्यार्थी आपल्या स्थानिक ठिकाणावरून पुढील शिक्षणासाठी अन्य शहरातील प्रतिष्ठीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असतात अशा प्रतिष्ठीत महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कशी केली जाईल? विविध पदविका, अकरावी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने काय योजना केली आहे व या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कधीपर्यंत घोषित केले जाईल? याबाबत कुठलीही योजना झाली नसल्यामुळे शासन प्रवेश प्रक्रियेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
– सिद्धेश्‍वर लटपटे, महाराष्ट्र प्रदेश मंत्री, अभाविप

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.