मुंबई –रिझर्व्ह बॅंक जारी करीत असलेल्या सुवर्ण रोखे शृंखलेतील रोखे 3 ते 7 ऑगस्टदरम्यान नागरिकांना खरेदी करता येणार आहेत.
या रोख्यांतील सोन्याचे मूल्य 5,334 रुपये प्रत्येक ग्रॅम ठरविण्यात आले आहे. याअगोदर 6 जुलै ते 10 जुलैदरम्यान विकण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांतील सोन्याची किंमत 4, 852 रुपये प्रति ग्रॅम होती. दरम्यानच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे त्यानुसार परवा उपलब्ध होणाऱ्या सुवर्ण रोख्यांतील सोन्याची किंमत वाढविण्यात आली आहे. जे ग्राहक या सुवर्ण रोख्याची ऑनलाइन मागणी करून डिजिटल पेमेंट करतील, अशा ग्राहकांसाठी रोख्यांची किंमत प्रत्येक गॅमला पन्नास रुपयांनी कमी ठेवण्यात येते. या वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेने हे रोखे एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान सहा टप्प्यात सुवर्ण रोखे जारी करण्याची घोषणा केले होती.
रिझर्व्ह बॅंक केंद्र सरकारच्या वतीने हे सुवर्ण रोखे करीत असते. भारतीय नागरिकांना एक ग्रॅम ते चार किलोदरम्यान सुवर्ण रोखे खरेदी करता येतात. हिंदू अविभक्त कुटुंबाला चार किलोपर्यंतचे सुवर्ण रोखे खरेदी करता येतात. तर ट्रस्ट विद्यापीठे आणि चॅरिटेबल संस्थांना 20 किलोपर्यंतच्या सोन्याचे रोखे विकत घेता येतात. केंद्र सरकारने सुवर्ण रोख्यांची योजना नोव्हेंबर 2015 पासून सुरू केली आहे. लोकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याच्या ऐवजी रोख्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करावे. यामुळे बचत वाढण्यास चालना मिळते. याकरिता ही योजना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.