सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सोमवारी झालेल्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत सत्रपूर्तता पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली करून, त्याद्वारे त्यांना संधी देण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल टाकले आहे.

अभ्यास मंडळाच्या बैठकीत कुलगुरू नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, सर्व अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी एखाद्या ठराविक कालावधीत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. पदवी व पदव्युत्तर शिक्षण ठराविक वर्षात पूर्ण करणे आवश्‍यक आहे. मात्र, त्या कालावधीत काही विद्यार्थी उत्तीर्ण होत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रथम वर्षापासून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावे लागते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, त्यासाठी सत्रपूर्तता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषयासाठी परीक्षेची संधी देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. परंतु सत्रपूर्तता केलेल्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळेल असे नव्हे. त्याकरिता अशा विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यात अटी व नियमावलीनुसार पुन्हा या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

त्याचप्रमाणे, विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या निकालात शिक्षक व विद्यापीठांकडून चुका होतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. अशा चुका झालेल्या शिक्षकांवर विद्यापीठाकडून कठोर व दंडात्मक तरतूद आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×