…तर आयात उमेदवारालाही संधी – अजित पवार

इच्छुकांनी नाराज न होता पक्षासाठी एकजुटीने काम करा 

पुणे – विधानसभा निवडणुकीत आघाडीला 145 चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी एनवेळी बाहेरून ताकदीचा उमेदवार मिळाला तर पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे इच्छुकांनी नाराज न होता पक्षासाठी एकजुटीने काम करा. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे उदाहरण देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी निवडणुकीची रणनिती स्पष्ट केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, शहर अध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यासह शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, भाजप-शिवसेनेकडून आमिषे दाखवून नेते आणि कार्यकर्त्यांची पळवा-पळवी केली जाते. एवढच नव्हे तर “तुमच्या प्रकरणांची चौकशी लावू’ अशी भीती दाखवून, नोटिस बजावली जाते. मात्र, हा सत्तेचा गैरवापर असून, भाजपला सत्तेचा माज आला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच जस ठरलय, तसं निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल हे आमच पण ठरलंय, अशा कानपिचक्‍याही पवार यांनी दिल्या.

यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना पवार म्हणाले, काही मंत्री म्हणतात पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्‍त करू, पण लक्षात ठेवा अशा घोषणा करणाऱ्या व्यक्‍तीस जशास तसे उत्तर देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

2014 ला टोलमुक्‍त महाराष्ट्र अशी भाजपने घोषणा दिली. मात्र, पुन्हा सत्तेत आल्यानंतर “टोल भरावाच लागेल’ असे नितीन गडकरी म्हणतात. बोगदे बांधण्याचा नावाखाली सरकार 1 हजार कोटी लाटणार असल्याचा आरोप पवार यांनी केला. यावेळी अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत मीडियावर खापर फोडले आहे. ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत वेगळ, अजित पवार यांचे मत वेगळ आणि सुप्रिया सुळे यांच मत वेगळ असे मीडियाने पसरवून नागरिकांमध्ये सभ्रमावस्था निर्माण केली. मात्र, लोकशाहीत बहुसंख्य लोकांचे मत काय ते महत्त्वाच आहे. माझ ही मत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावे, असंच आहे.

42 पैकी अवघे 18 नगरसेवकच उपस्थित
विधानसभेच्या तयारीसाठी पवार यांनी बोलविलेल्या बैठकीला महापालिकेतील 42 मधील अवघे 18 नगरसेवकच उपस्थित होते. त्यामुळे सगळे नगरसेवक का आले नाहीत अशी विचारणा पवार यांनी केली. तसेच या बैठकीपेक्षा इतर महत्त्वाची बैठक असल्याने उर्वरित नगरसेवक आले नसतील. त्यामुळे त्यांना बैठकीस का आले नाहीत याची विचारणा करा, अशा सूचना त्यांनी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या. पुण्यात असलेल्या आठही जागांसाठी सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन आघाडी होणारच असल्याचे पुन्हा एकदा सांगत आघाडीचा उमेदवार कोणाचाही असो सर्वांनी त्याला निवडून देण्यासाठी सर्वोत्परी काम करावे, कोणत्याही स्वरुपात तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. याशिवाय, लवकरच आघाडीतील जागा वाटप निश्‍चित झाल्यानंतर निवडूण येणाऱ्या उमेदवाराची क्षमता लक्षात घेऊनच तिकिट दिले जाईल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.