Baramati News | झेडपी गटांच्या पुनर्रचनेत नव्या शिलेदारांना संधी?

प्रभात वृत्तसेवा
बारामती – आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर केली आहे. बारामती तालुक्यात गट व गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच 6 व 12 अशी राहिली आहे. मात्र, नव्या पुनर्रचनेत सांगवी गणाचे अस्तिस्व संपुष्टात आले. एकसंघ राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच बारामती नगर परिषदेची सत्ता काबीज करण्याचे टार्गेट आहे.
त्यामुळे अजित पवार गटाकडून रणनिती आखली जात आहे. गेल्या अडीच वर्षांतील कालखंडात बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, छत्रपती सहकारी साखर कारखाना, बाजार समिती यासह अन्य सहकारी संस्थांवर कब्जा केला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारावर अजित पवार यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत अजित पवार यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क भक्कम झाले आहे.
येत्या सहा महिन्यांत बारामती तालुक्यात बारामती नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. मागील झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाने विरोधक भाजप, शरद पवार गटाला चारीमुंड्या चीत केले आहे.लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील रणनिती बदलून व्यापक प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. याचे सकारात्मक परिणाम निवडणुकीतून दिसून आले आहेत.
नवीन पिढीला वाव
बारामती तालुक्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत, झेडपीच्या निवडणुकीत तरूण पिढीला वाव देण्यात येणार आहे. यापूर्वीही अजित पवार यांनी तरूणांना सहकारी संस्थांवर संधी देत राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तोच पॅटर्न यंदाच्या निवडणुकीत राबविला जाणार आहे. तसेच संकेत मिळत आहेत.
यंग ब्रिगेडची दुसरी फळी तयार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षांत तरूणांचा सहभाग वाढविला आहे. तरूण निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली असून त्यातून बारामतीच्या राजकीय पटलावर तरूणांची दुसरी फळी तयार करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत. ही तरूणांची दुसरी फळी राजकीय मैदानावर लढण्यासाठी लंबी रेस का घोडा याप्रमाणे सक्रिय झाली आहे.





