पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा’ 1 नोव्हेंबर रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दि. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे.
ही परीक्षा 18 मे रोजी होणार होती. मात्र, करोनामुळे ती पुढे ढकलली. आता ती नोव्हेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करत जिल्हा केंद्राची निवड केली आहे. मात्र, बहुतांश उमेदवार त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर यापैकी त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडण्याची मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
यापूर्वी उमेदवाराने निवडलेले केंद्र रद्द करण्यात येणार आहे. आता उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलद्वारे दि. 17 ते 22 सप्टेंबरदरम्यान त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडण्यासाठी मुदत आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा असेल. केंद्राची निवड न करणाऱ्या उमेदवारांना निवासाच्या पत्त्याच्या आधारे केंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे.