जयंत पाटलांना रोखण्याचा विरोधकांचा निर्धार

विनोद मोहिते
-तिरंगी लढतीचा कोणाला होणार फायदा?
-निकालाकडे राज्याचे लक्ष

इस्लामपूर  – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातव्यांदा विधानसभेत जाणार की त्यांचा विजयी रथ विरोधक रोखणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे जयंत पाटील विरोधकांची एकजूट हे त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरले आहे. एकास-एक लढत द्यायची, या इराद्याने अनेक गट-तट एकत्र आले. पण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे गौरव नायकवडी आहेत. तिरंगी लढतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवडणूक सोपी वाटत आहे.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील, महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे गौरव नायकवडी, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील, वंचित आघाडीचे शाकिर तांबोळी या प्रमुख व्यक्ती निवडणूक रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातव्यांदा विधानसभा लढवत आहेत. प्रत्येकवेळी विक्रमी मताधिक्‍याने ते विजयी झाले आहेत. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांची राजकीय खेळी कशी असते, ते सर्वांना माहीत आहे. वाळवा तालुक्‍यात जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरु आहे.

विरोधकांच्यात विधानसभेची निवडणूक संपली की, आपण एकत्र येवून लढायला हवे होते. लढलेल्या सर्वांच्या मतांची बेरीज पाहिल्यावर त्यांचे डोळे उघडतात. यापुढे अशी चूक करायची नाही. आपण सर्वांनी एकत्र येवून जयंत पाटील यांना पराभूत करायचे, या इराद्याने सर्व विरोधक एकवटतात. ही विरोधकांची एकी विधानसभा संपल्यावर चार ते साडेचार वर्षापर्यंत अभेद्य असते. मात्र निवडणुकीचे वातावरण तापायला लागल्यावर प्रत्येक गटाच्या नेत्याला आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचा भास होतो आणि मीच लढायला पात्र आहे, असे म्हणत त्यांच्या एकजूटीला सुरुंग लागतो.

विरोधकांच्यातील याच कमजोरीचा फायदा जयंत पाटील यांना नेहमीच होत आला आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात आणि केंद्रात भाजप-सेनेचे सरकार असल्याने विरोधकांना बळ मिळाले. सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली. माजी खासदार राजू शेट्टी, कै. नानासाहेब महाडीक, शिराळ्याचे आ. शिवाजीराव नाईक यांनी जयंत विरोधकांना ताकद दिली. त्यामुळे नगरपालिकेतील सत्ता विरोधकांकडे आली. निशिकांत पाटील यांच्या रूपाने विरोधकांना नवा चेहरा मिळाला.

हे सर्व सुरळीत सुरु असताना सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसले. त्यानंतर इस्लामपूरच्या विरोधी विकास आघाडी अंतर्गत एक-एक नेता आपआपला स्वतंत्र गट घेवून नाचू लागला. सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यात अंतर पडत गेले. मंत्री खोत यांनी विकास आघाडीतील निशिकांत पाटील वगळता सर्वांना एकत्र करुन सवतासुबा मांडला.

निवडणुकीच्या तोंडावर हुतात्मा गटाचे युवानेते गौरव नायकवडी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आणि शिवसेनेचे तिकीट नायकवडी यांनी खेचून आणले. तसेच आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचे जाहीर केले होते.
निशिकांत पाटील हे गेल्या तीन वर्षापासून विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तयारी करत आहेत. गावनिहाय बुथ समित्या स्थापन करुन गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी तयार केले आहे.

महाडीक गटाचे राहुल महाडीक, भाजपचे विक्रम पाटील, कवठेपिराणचे पै. भीमराव माने, हुतात्मा गट हे सर्वजण सदाभाऊ खोत यांच्या सोबत आहेत. पक्ष कोणाला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू असे दोन्ही गट सांगत होते. पण नायकवडी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. असे असले तरी त्यांच्या मनात निर्माण झालेली दरी निवडणुकीच्या निमित्ताने वाढली आहे. आता निशिकांतदादांनी बंडखोरी केली आहे. यामुळे भाजपाने त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची कार्यकारणी बरखास्त केली आहे.

या उलट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची विण घट्ट आहे. राजारामबापू उद्योग समूहाच्या माध्यमातून गावागावातील कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदार संघ हा जयंत पाटील यांचा अभेद्य किल्ला आहे. तो जिंकायचा असेल तर एकजुटीने लढायला हवे. विरोधकांच्यात मात्र लढाई पूर्वीच नेता होण्याची चढाओढ लागली आहे. या सर्वांची मोट बांधून त्यांना एकत्र ठेवणाऱ्या नेतृत्वाची खरी गरज होती. यासाठी निशिकांत पाटील यांची बंडखोरी रोखली जाईल असे वाटले होते. पण ते शक्‍य झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.