सोक्षमोक्ष: विरोधकांनीच केला विरोधकांचा पराभव

मुकुंद फडके

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची रणनीती भाजपला पुन्हा एकदा सत्तेकडे घेऊन गेली असली तरी विरोधकांच्या चुकलेल्या रणनीतीनेही या विजयाला हातभार लावला आहे. त्यामुळे भाजप आघाडीपेक्षाही “विरोधकांनीच केला विरोधकांचा पराभव’ असे म्हणावे लागते.

आतापर्यंतची सर्वात चुरशीची मानली गेलेली ही निवडणूक भाजप आघाडीने जेवढी एकत्रपणे आणि गांभीर्याने लढली तेवढी एकी आणि गांभीर्य कॉंग्रेस आघाडीला दाखवता आले नाही. शिवाय चुकलेल्या रणनीतीचाही फटका बसला. विरोधी पक्षांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे घेऊन विरोधकांना कमकुवत करतानाच आपला विजय पक्‍का करण्याची भाजपची रणनीती विरोधकांच्या विशेषतः कॉंग्रेसच्या लक्षात आली नाही. महाराष्ट्रातील नगर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने वेळीच ही जागा आपल्याकडे घेतली असती आणि सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली असती तर त्यांनी पक्षही सोडला नसता आणि ते भाजपच्या तिकिटावर विजयी होण्याचा विषयही उपस्थित झाला नसता. ही जागा कॉंग्रेसच्या कोट्यात मागून घेण्याऐवजी सुजय यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव कॉंग्रेसकडूनच देण्यात आला होता.

राष्ट्रवादीशी वाटाघाटी करून ही जागा कॉंग्रेसकडे घेण्यात अपयश आल्याचाच फटका विरोधकांना बसला. याच मतदारसंघातील भाजपची रणनीती व्यवहार्य होती. कारण भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी याचे तिकीट कापून सुजय यांना उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय पक्षाने घेतला. असे धाडस कॉंग्रेसला दाखवता आले नाही.

भाजपने अनेक ठिकाणी असे निर्णय घेतले आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्यांचा सन्मान केला. माढा मतदारसंघात निवडून आलेले रणजितसिंह निंबाळकर हे 6 महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनीही कॉंग्रेसचा हात सोडून कमळ पकडले. या मतदारसंघातील मावळते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. जरी त्यांनी निवडणूक लढवली नसली तरी मोहिते पाटलांच्या मतांमुळेच रणजितसिंह निंबाळकर यांचा विजय सोपा झाला. याच मतदारसंघाचा भाग असलेल्या माण खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही आघाडी धर्म न पाळता भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. म्हणजे येथेही विरोधकांनीच विरोधकांचा पराभव करण्यास हातभार लावला.

कोल्हापुरात कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अत्यंत उघडपणे आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पराभूत करण्याचे आमचे ठरलेय ही त्यांची घोषणा गाजली होती. त्याप्रमाणे कोल्हापुरात महाडिक यांचा पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी शिवबंधन बांधले आणि निवडणुकीत आपल्या पुत्राला शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवून दिला. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला.

शिवाय महाराष्ट्रातील सुमारे 10 लोकसभा मतदारसंघांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरल्याचे चित्र मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. नांदेड, परभणी, हातकणंगले, सांगली, अकोला, सोलापूर यांसह सुमारे 10 मतदारसंघांत “वंचित’च्या उमेदवारांनी लाखांवर मते घेतल्यामुळे येथील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचा निष्कर्ष काढावा लागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकारच्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित आघाडीला हातमिळवणीचा प्रस्ताव देऊन चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे. पण हाच निर्णय लोकसभेसाठी घेतला असता तर किमान महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसले असते.

प्रकाश आंबेडकर सातत्याने कॉंग्रेसकडे युती करण्याची मागणी करीत होते; पण ती मागणी कॉंग्रेसने कधीच गांभीर्याने घेतली नाही. वंचित बहुजन आघाडीला फक्‍त 6 जागा देण्याचा त्यांचा प्रस्ताव कायम होता. यात कोणतीही तडजोड न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर जागा लढवल्या आणि कॉंग्रेस आघाडीला त्याचा फटका बसला. वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टीकाही कॉंग्रेस नेत्यांनी केली. ते वादापुरते खरे मानले तरी कॉंग्रेसला ही रणनीती ओळखता आली नाही, असेच म्हणावे लागते.

राजधानी नवी दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी युती करण्याबाबत धरसोड दाखवल्याने येथील सर्व 7 जागा भाजपला मिळाल्या. उत्तर प्रदेशातही कॉंग्रेसने सपा आणि बसपा यांच्याशी आघाडी करण्यात स्वारस्य न दाखवल्याने मतविभागणी होऊन पुन्हा भाजपचा फायदा झाला. यावेळच्या निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन भाजपने आपल्या मित्रांना जवळ आणण्याचा जो यशस्वी प्रयोग केला तो कॉंग्रेसला जमला नाही.

शिवसेनेने मोदी आणि भाजप यांच्यावर प्रचंड टीका करूनही भाजपने शिवसेनेचा विश्‍वास पुन्हा मिळवला आणि त्यांच्या एकीमुळेच त्यांना यश मिळाले. राज्यात भाजपचे रामदास आठवले यांच्यासारखे आणखी मित्रपक्ष आहेत; पण त्यांच्यापैकी कोणालाही लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नव्हती तरीही ते पक्ष भाजपसोबत राहिले अशी रणनीती कॉंग्रेस आघाडीला आखता न आल्यानेच मित्र दुरावले आणि मतांमध्ये फूट पडली. विरोधकांमधील दुही आणि दुराग्रह हेच अशा प्रकारे विरोधकांच्या दारुण पराभवाचे कारण असल्याने आता आगामी निवडणुकीत तरी विरोधी पक्ष सावध होतील अशी अशा करावी लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here