विरोधक मतांसाठी जातीयतेचे विष पेरत आहेत : आ.राजळे

पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी माझ्यावर टीका सुरू केली आहे. विकासकामाचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेत छापलेल्या कामांपैकी एक काम खोटे निघाले तर पुन्हा मत मागायला येणार नाही.

मतदारसंघात कुठेही जातीयतेचा रंग नसताना विरोधक मतासाठी जाणीवपूर्वक विष पेरत आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही, असा विश्‍वास भाजपा आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. भालगाव जिल्हा परिषद गटातील खरवंडी येथे झालेल्या प्रचारसभेत राजळे बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पांडुरंग खेडकर, वृद्धेश्‍वर कारखान्याचे संचालक सुभाष अंदुरे, सुरेश केळगंद्रे, शेवगावचे नगरसेवक अरुण मुंडे, संजय कीर्तने, अशोक खरमाटे, वामन कीर्तने, सुभाष केकाण, बुधाजी ढाकणे, सुनिल अंदुरे ,भाऊसाहेब सांगळे, प्रदीप पाटील, बाबासाहेब बोरुडे, सुधीर कोळपकर रामभाऊ गर्जे, राजेंद्र पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षातील विकास कामामुळे व लोकसंपर्कामुळे निवडणुकीच्या निकालाची आपल्याला मुळीच काळजी नाही. ट्रकभर नारळ फोडले गेले असा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र लोकांचा आपल्यावर विश्‍वास आहे. लोकांना सांगण्यासारखे विरोधकांकडे काहीही नसल्याने वेगवेगळ्या अफवा पसरून गैरसमज पसरवला जात आहे. निवडणुका आल्यानंतर त्यांना स्वतःची जात आठवू लागली आहे. शेवगाव – पाथर्डी असा भेदभाव निधी देताना आपण कधीही केला नाही. अकराशे कोटीची विकासकामे करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विकास कामांमध्ये मोठा सहभाग आहे. नामदार मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. भावनिक होऊन विषारी प्रचार करणाऱ्या विरोधकांना थारा देऊ नका.

उमेदवारीसाठी सर्व पक्षाकडे फिरून आले मात्र कुणीही थारा दिला नाही. राष्ट्रवादीचे घड्याळ कुणी हातात बांधायला तयार नव्हते शेवटी कुणीच थारा देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर यांनी गळ्यात माळ घातली आहे. पाच वर्ष झोपा काढून निवडणुकीला जाग्या होणाऱ्यांना धडा शिकवा अशी टीका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यावर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.